नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानसभा निवडणुकीत महाआघाडी उमेदवाराचा प्रचार केला नाही या कारणातून तीन जणांच्या टोळक्याने एका तरूणास बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत युवकावर चाकूने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फजल शेख,मोनू अन्सारी व तहसीन शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अर्शद अजीज शेख (२३ रा.सनशाईन अपा.रॉयल कॉलनी पखाल रोड,अशोका मार्ग) या युवकाने फिर्याद दिली आहे. अर्शद शेख रविवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास नागजी चौकातील कय्युम केटर्सच्या बाजूला असलेल्या नवाब चहा येथे गेला असता ही घटना घडली. संशयित त्रिकुटाने त्यास गाठून विधान सभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवाराचे काम केले नाही या कारणातून कुरापत काढून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी संतप्त फजल शेख याने चाकूने हल्ला करीत अर्शद शेख यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेत अर्शदच्या खांद्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार डंबाळे करीत आहेत.