नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युट्यूब चॅनलला सब्सक्राईब केल्यास पन्नास रूपये मिळतील असे आमिष दाखवून भामट्यांनी एका विद्यार्थ्यास तब्बल पावणे दोन लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. युवकाचा विश्वास संपादीत करून भामट्यांनी त्यास वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून ही फसवणुक केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव निवृत्ती दराडे (मुळ रा.चापडगाव ता.ननिफाड) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. दराडे शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तो मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी तो आपल्या रूमवर असतांना ९३७२७१७६९६ या क्रमांकावरून त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर त्यास टेलीग्रॅम अॅपवर लिंक पाठवून ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून संबधीताच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राईब केल्यास पन्नास रूपये मिळतील असे सांगण्यात आल्याने दराडे याने चॅनलला सब्सक्राईब केल्याने ही फसवणुक झाली.
एकाच दिवसात दराडे याने खूपवेळा सब्सक्राईब केल्याने त्याला मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सदरचे पैसे बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यास विविध अकाऊंटमध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. दराडे यांनी तब्बल १ लाख ८३ हजाराची रक्कम भरूनही पदरात एक रूपयाही न पडल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक नरूटे करीत आहेत.