नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मतदान केंद्रात मोबाईलवर बंदी असतांनाही शहरातील एकाने मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ फेसबुक सोशल साईडवर अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया प्रसंगी घडला असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात फेसबुक पेज धारकाविरोधात लोकप्रतिनीधी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी रावडी राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फेसबुक पेज चालकाचे नाव आहे. विधान सभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी (दि.२०) राज्यात पार पडली. या निवडणुकीत भारत निवडणुक आयोगाने निर्देशांचे कडेकोट पालन करण्यात आले. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी व सोशल मीडियामुळे कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी मोबाईलवर निर्बंध घालण्यात आले होते. मतदान केंद्रावर मोबाईलवर बंदी घालण्यात आल्याने ही प्रक्रिया निविघ्न पार पडलेली असतांना एकाने मतदान केंद्रात चोरीछुपी मोबाईल सोबत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोशल मीडियावर नजर ठेवून असलेल्या सायबर सेलच्या ही बाब निदर्शनास आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मोबाईलधारकाने फेसबुक या सोशल मीडियावर मतदान करतांनाचा व्हिडीओ अपलोड केल्याने आपल्या उमेदवाराचा दबदबा कायम आहे. हे फेसबुकवर पोस्ट करून आदर्श आचार संहितेचे उलंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शशिकांत साबळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास जमादार मुसळे करीत आहेत.