नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधान सभा निवडणुकीत उमेदवाराचे पैसे वाटत असल्याच्या संशयितांनी चार जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना मधुबन कॉलनीत घडली. या घटनेत काही तरी वजनी वस्तू डोक्यात मारण्यात आल्याने तक्रारदार युवक जखमी झाला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
मुकूंद सुदाम कासार (२४ रा.के.के.वाघ मागे अपोलो हॉस्पिटल जवळ) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. कासार व अभिजीत पांगरे हे दोघे मित्र मंगळवारी (दि.१९) रात्री मधुबन कॉलनी भागात राहणा-या सुनिल रोकडे या मित्रास भेटण्यासाठी दुचाकीवर आले असता ही घटना घडली.
अमृतगार्डन भागातून दोघे दुचाकीवर जात असतांना गायकवाड नामक इसम, एक महिला व अन्य दोन जणांच्या टोळक्याने त्यांची वाट अडविली. उमेदवाराचे पैसे वाटप करीत आहेत का अशी विचारणा करीत टोळक्याने दोघा मित्रांना शिवागाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने वजनी वस्तू डोक्यात मारल्याने तक्रारदार कासार जखमी झाले असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.