नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यात मोटारसायकल लावून फरसान घेण्यासाठी दुकानात जाणे एकास चांगलेच महागात पडले आहे. पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून भामट्यांनी पाच लाख रूपयांची रोकड हातोहात लांबविली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पांडूरंग मंडलिक (६५ रा.पेंडारकर कॉलनी,जिजामातानगर जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. मंडलिक बुधवारी (दि.११) नाशिकरोड परिसरातील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पाच लाख रूपयांची रक्कम असलेली कापडी पिशवी त्यांनी एमएच १५ एचडब्ल्यू ०२३८ या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून घराकडे निघाले होते.
वाटेत फरसान घेण्यासाठी गुरूनानक पेट्रोल पंप परिसरातील एटूझेड नावाच्या किराणा दुकानासमोर थांबले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून रोकडची पिशवी चोरून नेली. मंडलीक फरसान घेवून परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.