नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील वेगवेगळया भागात धारदार शस्त्र घेवून फिरणा-या दोघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. त्यात एका सुराधारी तडिपाराचा समावेश असून संशयितांच्या ताब्यातून कोयत्यासह सुरा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सो्न्या उर्फ कल्पेश मनोज झगडे (२३ रा.भंडारीबाबा चौक,नवदुर्गा ) व प्रथमेश सुनिल चव्हाण (२१ रा.जमिल अपा. बोधलेनगर बसस्टॉप जवळ नाशिक पुणा हायवे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शस्त्रधारीची नावे आहेत. त्यातील झगडे हा तडिपार गुंड असून चव्हाण याच्यावर यापूर्वीही शस्त्रबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. झगडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर त्याच्याविरूध्द शहर पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी त्यास तडिपार करण्यात आलेले असतांना तो रविवारी (दि.१७) रात्री जुने नाशिक परिसरातील कुंभारवाडा भागात मिळून आला. त्याच्या अंगझडतीत धारदार सुरा मिळून आला असून याप्रकरणी अमंलदार गुरूदादा गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयत आला आहे. अधिक तपास हवालदार नरेंद्र जाधव करीत आहेत.
दुसरी कारवाई बोधलेनगर बसस्टॉप भागात करण्यात आली. प्रथमेश चव्हाण हा अशोकामार्गच्या दिशेने जाणा-या सर्व्हीस रोडवर धारदार कोयता सोबत घेवून फिरतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून लोंखडी कोयता हस्तगत करण्यात आला असून अमलदार राजेंद्र नाकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.