नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या तुंबळ हाणामारीत मामा भाचे जखमी झाले. शरणपूररोड भागात घडलेल्या या घटनेत दगडफेक करण्यात आल्याने चार जण जखमी झाले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जोजो मायकल, लकी भंडारे, आदित्य कु-हाडे व बंटी वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रोहित कर्णबहाद्दूर सेशी (२० रा.निशीगंधा अपा.सिटी सेंटर मॉलजवळ उंटवाडीरोड) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. रोहित सेशी व त्याच्या मावशीचा मुलगा विक्रम सोनार हे दोघे सोमवारी (दि.१८) पाईप लाईन रोडवरील आरंभ टर्फ येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. या ठिकाणी क्रिकेट खेळण्याच्या कारणातून त्यांचा संशयिताशी वाद झाला होता. त्यानंतर दोघे भाऊ आपल्या घराकडे निघाले असता ही घटना घडली.
रचना विद्यालयाच्या कंपाऊड जवळ संशयितांनी दोघा भावांची वाट अडवित त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच सेशी याचा मोठा भाऊ प्रेमलाल व मामा तेजेंद्र सोनार दोघांच्या मदतीला धावून आले असता संशयितांनी दगड फेक करीत त्यांनाही मारहाण केली. या घटनेत मामा भाचे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.