नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी लष्करी अधिकारी असलेल्या एका बँक ग्राहकास सहा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे वर्ग करून देण्याच्या मोबदल्यात आॅनलाईन लिंक पाठवून भामट्यांनी रोकडवर डल्ला मारला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदुम्माकुमार काशिनाथ मिश्रा (मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली आर्टीलरी,देवळालीकॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिश्रा देवळाली कॅम्प येथील आर्टीलरी सेंटरमध्ये सुबेदार पदावर कार्यरत आहेत. मुंबई येथील कॅन्टीन स्टोअरला पैसे पाठवायचे असल्याने मिश्रा रविवारी (दि.१७) गुगलवर ऑनलाईन एसबीआय बँकेचे अॅप डाऊन लोड करीत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता.
बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी मिश्रा यांची चौकशी करीत व्हॉटसअॅपवर एक लिंक पाठविल्याने ही फसवणुक झाली. मिश्रा यांनी मोबाईलवर आलेली लिंक ओपन करताच त्यांच्या वेगवेगळाया दोन बँक खात्यातील अनुक्रमे ४ लाख ९५ हजार व एक लाख १ हजार रूपये असे सुमारे ५ लाख ९६ हजाराची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करण्यात आली असून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच मिश्रा यानी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.