नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एकाने प्रेमाच्या जाळयात अडकवून मुलीला कुमारी माता बनविल्याने तर दुस-या प्रकरणात कुटूंबियास जीवे ठार मारण्याची तरूणीस घरात उचलून नेण्याची धमकी देण्यात आल्याने पीडितांनी पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंचवटीतील सेवाकुंज भागात राहणा-या अल्पवयीन पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ऋतिक भाऊसाहेब जोगदंड (२३ रा.रामदास स्वामी नगर,टाकळीरोड) या युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवत प्रेमाच्या जाळय़ात अडकविले होते. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान संशयिताने मुलीस आपल्या दुचाकीवर डबलसिट बसवून टाकळीफाटा येथील शहनाई लॉन्स शेजारील लॉजवर घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली होती. गेल्या गुरूवारी (दि.७) मुलीने स्त्री जातीच्या अपत्याला जन्म दिला असून पोलीसांनी तात्काळ संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
दुसरी घटना काठेगल्ली भागात घडली. बनकर चौक राहणा-या तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार मोठ्या राजवाड्यातील ऋतीक तेजाळे हा युवक तिचा २०१८ पासून तिचा पाठलाग करीत आहेत. घर शाळा व महाविद्यालय गाठून तो प्रेमसंबध ठेवून लग्नाची मागणी घालत आहे. मुलीने त्यास नकार दिला असता संशयिताने तिची वाट अडवून आपल्या दुचाकीवर बसवित निसर्ग रेस्टॉरंट येथे नेले होते. या ठिकाणी काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मारहाण केली. येवढ्यावरच न थांबता त्याने शनिवारी (दि.१६) युवतीचे घर गाठून शिवीगाळ व कुटुंबियास जीवे ठार मारण्याची तसेच मुलीस घरातून उचलून नेण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर त्याच्या आईने मोबाईलवर कुटूंबियास शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मायलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.