नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसस्थानके आणि थांब्यावरील गर्दीत भामटे महिलांचे अलंकार हातोहात लांबवित आहेत. नुकत्याच वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी सुमारे साडे चार लाख रूपये किमतीचे अलंकारावर डल्ला मारला. याप्रकरणी आडगाव आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा सुरेश सुर्यवंशी (रा. चित्तेगाव फाटा,दारणा सांगवी ता.निफार्ड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या शनिवारी (दि.१६) शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास सुर्यवंशी या परतीच्या प्रवासासाठी छत्रपती संभीजानगर नाका भागातील थांब्यावर गेल्या असता ही घटना घडली. चित्तेगाव येथे जाण्यासाठी त्या महामंडळाच्या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्याने त्यांचया गळयातील ४० हजार रूपये किमतीचे व दोन तोळे वजनाचे गंठण मंगळसुत्र हातोहात लांबविले. ही घटना बसमार्गस्त झाली असता निदर्शनास आली.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुह्याची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. जयवंताबाई निवृत्ती गुंजाळ (६८ रा.काळुस्ते ता.इगतपुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुंजाळ या गुरूवारी (दि.१४) आपल्या नातीस सोबत घेवून शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या परतीच्या प्रवसासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. नाशिक इगतपुरी बसमध्ये आजी आणि नात चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख ४ हजार रूपये किमतीचे डोरले हातोहात लांबविले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार अहिरे करीत आहेत.