नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ता ओलांडून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्या महिलांनी वृध्देच्या गळयातील सोनसाखळीसह पिशवीतील रोकडवर डल्ला मारल्याची घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर सिग्नल भागात घडली. या घटनेत सुमारे ७० रूपयांचा ऐवज लांबविण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतुरा सदाशिव भिसे (७२ रा.प्रगतीनगर,सायखेडारोड पंचक ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चतुरा भिसे या मंगळवारी (दि.१०) नाशिकरोड भागात आल्या होत्या. नाशिक पुणा रोडवरील दत्तमंदिर सिग्नल भागात त्या रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जाणा-या दोन भामट्या महिलांनी त्यांना गाठले. यावेळी दोघींनी मदतीचा बहाणा करून दुभाजकावर घेवून जात ही चोरी केली. भिसे यांना बोलण्यात गुंतवून भामट्या महिलांनी त्यांच्या गळयातील सुमारे ६६ हजार रूपये किमतीची सोनसाखळी व हातपिशवीत ठेवलेली मिनी पर्स हातोहात लांबविली.
या पर्स मध्ये अडिच हजाराची रोकड घराची चावी व महत्वाचे कागदपत्र होते. रस्ता ओलाडून देत दोघी भामट्या पसार झाल्यानंतर ही बाब भिसे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.
९० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौरी गणपतीचे दर्शन घेवून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात घडली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिती अभिषेक देशमुख (रा.सौभाग्यनगर,लॅमरोड विहीतगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख या बुधवारी (दि.११) रात्री सासू आणि मुलांना सोबत घेवून मुक्तीधाम भागात राहणा-या मैत्रीणीकडे गौरी गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. नऊ वाजेच्या सुमारास त्या सासू व मुलांसह घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. मुक्तीधाम परिसरातील मनपा शाळा क्र १२५ च्या मैदाना शेजारील रस्त्याने त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोन्याची पट्टीपोत हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.