नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओझरच्या एचएल कारखान्यात नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून एकाने बेरोजगार युवकास तब्बल बारा लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. महिना उलटूनही नोकरी न लागल्याने तरूणाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत विजय पगारे असे बेरोजगारास फसवणूक करणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत सागर बाबुराव तांबे (२८ रा.जिव्हाळे -ओझर ता.निफाड) या युवकाने फिर्याद दिली आहे. संशयिताने काही महिन्यांपूर्वी तांबे याची भेट घेतली होती. ओझरच्या एचएल कारखान्यातील अधिका-यांशी ओळखी असल्याचे भासवून नोकरीचे आमिष दाखविले होते. तांबे यांचा विश्वास संपादन करीत भामट्याने या कामाच्या मोबदल्यात अधिका-यांसाठी आर्थिक मागणी केली.
अल्पावधीत नोकरीची ऑर्डर काढून देतो असे सांगून त्याने २९ ऑगष्ट ते २६ सप्टेंबर दरम्यान तांबे यांची पंचवटी कॉलेजच्या गेटवर भेट घेत बारा लाख रूपये स्विकारले. मात्र दीड महिना उलटूनही नोकरी लागली नाही. तांबे यांनी पैसे परत करण्याबाबत संशयिताकडे तगादा लावला असता त्याने टाळाटाळ केल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.