नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक वादातून शालेय कर्मचा-यांनी शिक्षण संस्थेची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात पैसे व सुविधाचा लाभ घेवूनही जास्तीच्या आर्थिक मागणीसाठी हा प्रकार घडला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक इंगुळकर,शैला शर्मा,संजय ताठे,सुनिता कांबळे,सुनिल छटोळे,सोनू ढिंगण,दिपक गायकवाड,किशोर ताठे,पोपट सोनवणे,सरला निकम, हिरामण गुंबाडे आदींसह अन्य कर्मचा-यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रतन सोली लथ (रा.वृदावन कॉलनी,पाईपलाईन रोड गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. लथ बॉईज टाऊन पब्लीक स्कुलचे संचालक असून संशयित याच विद्यालयाचे कर्मचारी आहे. शाळा प्रशासन आणि कर्मचा-यांमध्ये वाद उफाळून आल्याने हा प्रकार न्यायालयात पोहचला आहे. २०२३ मध्ये सदर कर्मचारी एका कामगार संघटनेचे सदस्य असतांना त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगुण तसेच न्यायालयीन प्रकरण मागे घेतल्याची बतावणी करीत संस्थेकडून आर्थिक व मुलांच्या मोफत शिक्षणाची सुविधा लाटली.
यानंतर पुन्हा प्रत्येकी एक लाख रूपयांची आर्थिक मागणी करण्यात येत असून १५ दिवसात पैसे अदा न केल्यास न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास निरीक्षक जानकर करीत आहेत.