इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जोधपूरः राजस्थानातील पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ कार खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. मृत कुटुंबीय कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
पाली जिल्ह्यातील सांडेरावचे पोलिस अधिकारी लक्ष्मण सिंह यांनी सांगितले, की गुरुवारी रात्री केनपुरा गावाजवळ हा अपघात झाला. कारमधील सहा जण त्यांच्या नातेवाईकांना भेटून जोधपूर येथून सिरोही जिल्ह्यातील शेओगंजच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. शेओगंज येथून परतत असताना महामार्गावरील केनपुराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी होऊन ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. बाबूराव (वय ५०), त्यांच्या पत्नी सारिका (३८), मुलगी साक्षी (१९) आणि मुलगा संस्कार (१७) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना सांडेराव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात वेग जास्त असल्याने कार खड्ड्यात पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कारमधून मृतदेह बाहेर काढले. हे कुटुंब चांदी व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. ते शिवगंज येथील त्यांचे मित्र आणि ज्वेलरला भेटण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री जोधपूर येथून परतत असताना हा अपघात झाला.