नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागातून तीन दुचाकी चोरट्यानी पळवून नेल्या. याप्रकरणी आडगाव,सरकारवाडा व अंबड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
आडगाव शिवारातील कुणाल प्रदिप वैष्णव (रा.आशापूरी पार्क अंबिका टेक्सटाईल मागे) यांची बुलेट एमएच ०५ सीआर ९२०० गेल्या सोमवारी (दि.११) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.
दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानक आवारात घडली. मारूती शेषराव नरोटे (रा. पार्वताबाई नगर,जेलरोड) हे गेल्या २८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकात गेले होते. जनता हॉटेल समोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ ईझेड ३०८५ पार्क केली असता ती चोरट्यानी पळवून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील केवलपार्क भागात घडली. प्रकाश सुखदेव साळुंखे (रा.संस्कृती अपा.केवलपार्क) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. साळुंखे यांची एमएच १५ एफएच ९४७९ मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.९) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यानी ती चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.