नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली विधान सभा निवडणुक ऐन रंगात आलेली असतांनाच माजी नगरसेवकाने लाखोंचा बेकायदा मद्यसाठा करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपनगर पोलीसांनी केलेल्या कारवाई साडे सात लाख रूपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बापलेकाविरोधात दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भगवंतराव सातभाई व अश्विन अशोक सातभाई (रा.दोघे गोल्डन नेस्ट सोसा.जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बापलेकाचे नाव आहे. अशोक सातभाई माजी नगरसेवक असून त्यांच्या मालकीच्या राहत्या सोसायटीतील गाळयात मोठ्या प्रमाणात दारू साठा करण्यात आल्याची माहिती उपनगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत सुमारे सात लाख ५२ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा पोलीसांच्या हाती लागला आहे. या गाळयात मॅकडॉल आणि ऑॅफिसर चॉईस नामक दारूने भरलेल्या बाटल्यांची ९८ खोकी आढळून आली.
अंमलदार सुनिल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक, परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक निरीक्षक डॉ.सचिन बारी व वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीव फुलपगारे,उपनिरीक्षक प्रभाकर सोनवे,शशिकांत पवार,सुरेश गवळी हवालदार विनोद लखन,इम्रान शेख पोलीस नाईक गोविंद भामरे,शिपाई सौरभ लोंढे,सुनिल गायकवाड,पंकज कर्पे,संदेश रगतवान,जयंत शिंदे,गौरव गवळी,अनिल शिंदे आदींच्या पथकाने केली.









