नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ब्लॅकमेल करीत एकाने तरूणीकडून ६० हजाराची रोकड उकळत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताचा अतिरेक वाढल्याने युवतीने आपबिती आपल्या कुटुंबियाकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, पोलीसांनी तात्काळ संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज अस्लम खान (२४ रा.एकलहरारोड ना.रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे मित्र मैत्रीण आहेत. गेल्या मे महिन्यात संशयिताने आपल्या मैत्रीणीच्या मोबाईल हाताळतांना तिचे फोटो व व्हिडीओ स्व:ताला सेंड करून घेतले होते. सदरचे फोटो व व्हिडीओचे अश्लिलतेत रूपांतर करून त्याने तरूणीस ब्लॅकमेल केले.
गेले पाच सहा महिन्यात संशयिताने वेळोवेळी सोशल मीडियावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीकडून ६० हजार रूपये उकळले. मात्र सोमवारी (दि.११) परिसिमा पार करीत संशयिताने युवतीचे घर गाठून तिचा विनयभंग केल्याने हा प्रकार पोलीसात गेला असून भेदरलेल्या तरूणीने आपबिती आपल्या कुटुंबियाकडे कथन केल्याने पोलीसात तक्रार दाखल झाली आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.