नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले. ही कारवाई लोखंडे मळा भागात करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून लोखंडी कोयत्यासह दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून पोलीसांची चाहूल लागताच या टोळीतील तीन जण पसार झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनव गोपाळ कुर्डे (२२ रा.प्रेस कॉलनी,नेहरूनगर), अनिकेत दादा भालेराव (२७ रा.अमर हौ.सोसा शिखरेवाडी) व अनिकेत नितीन गिते (१९ रा.महात्मा फुले नगर,ना.रोड) अशी पोलीसांच्या हाती लागलेल्या संशयितांची नावे असून, पोलीसांची चाहूल लागताच सागर सुर्यवंशी नामक तरूण व त्याचे दोन मित्र पसार झाले आहेत.
याप्रकरणी हवालदार ईम्रान शेख यांनी फिर्याद दिली आहे. उपनगर पोलीसांचे गस्ती पथक मंगळवारी (दि.१२) मंगळवारी मध्यरात्री लोखंडे मळयातील रघुविरनगर भागात गस्त घालत असतांना संशयित दादाभाऊ नगर पाठीमागील मोकळय़ा मैदानात मिळून आले. संशयास्पद हालचालींवरून पोलीसांनी सापळा लावून तिघांना बेड्या ठोकल्या असून पोलीसांची चाहूल लागताच संशयितांचे तीन साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांच्या अंगझडतीत धारदार कोयत्यासह स्कु ड्रायव्हर,लोखंडी पकड दोरी असे दरोड्याचे साहित्य मिळून आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.