नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर ट्रेंडीगच्या बहाण्याने सायबर भामट्यानी शहरातील एका वृध्दास ७३ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीवर अल्पावधीत जास्तीचा लाभ देण्याचे आमिष दाखवून ही फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण बलराज गुप्ता (७२ रा.सावरकरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुप्ता यांच्याशी गेल्या सप्टेंबर महिन्यात ९६३०४३४७९२ या मोबाईल धारकाने संपर्क साधला होता. सुनिल सिंघानिया नाम धारण केलेल्या संशयित मोबाईल धारकाने गुप्ता यांना व्हॉटसअपवर लिंक पाठवून त्या लिंकच्या माध्यमातून बी २५ अॅण्ड प्रॉफिट पार्टनर या व्हॉटसअप ग्रुपमध्ये अॅड केले होते. या ग्रुपवरील शेअर ट्रेंडीग बाबत खोटी माहिती देत संशयितांनी गुप्ता यांचा विश्वास संपादन करून ही फसवणुक केली.
कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुक केल्यास अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आल्याने गुप्ता भामट्यांच्या भूलथाबांना बळी पडले. ११ सप्टेंबर ते ३० ऑक्टोंबर दरम्यान गुप्ता यांना विविध बँक खात्यात तब्बल ७३ लाख रूपये भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र त्यानंतर मुद्दल आणि मोबदला पदरात न पडल्याने गुप्ता यांनी संबधीतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक राजपूत करीत आहेत.