नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमाच्या जाळयात अडकवत एकाने रायगड स्थित महिलेवर नाशिकमध्ये वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताकडून मागणी वाढल्याने महिलेने नकार दिला असता त्याने अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून रायगड पोलीसांनी हा गुन्हा शहर पोलीसांकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संतोष अर्जुन भालेराव (४० मुळ रा.खेडगाव जि.औरंगाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रायगडस्थीत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित तिचा नातेवाईक असून, तो नाशिक शहरात वास्तव्यास आहे. विवाहनंतर दोघांमध्ये प्रेमसंबध जुळले. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत संशयिताने अनेक वेळा महिलेशी संपर्क साधत तिला शहरात बोलावून घेत अत्याचार केला.
२०१८ मध्ये त्र्यंबकरोडवरील महात्मानगर भागात असलेल्या हॉटेल बंजारा येथे दोघे भेटले होते. या ठिकाणी संशयिताने बळजबरीने बलात्कार करीत महिलेचे अश्लिल फोटो काढले. यानंतर मात्र ब्लॅकमेल करून त्याने याच ठिकाणी बोलावून घेत महिलेवर अनेक वेळा अत्याचार केला. गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या अत्याचारास कंटाळलेल्या महिलेने त्यास शहरात येण्यास नकार दिल्याने त्याने अश्लिल व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने रायगड पोलीसात धाव घेतली असून हा गुन्हा गंगापूर पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.