नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रविवारी (दि.१०) वेगवेगळ्या भागात दोन महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. दोन्ही घटनांमध्ये भामट्यांनी सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीच्या अलंकारावर डल्ला मारला असून याप्रकरणी भद्रकाली आणि अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोत पहिली घटना घडली. सरला मधुकर पाटील (रा.इंद्रनगरी कामटवाडारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या मुलीच्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. वाटेत मैत्रीण भेटल्याने त्या रस्त्यात गप्पा मारत उभ्या असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचा सोन्याची शॉट पोत हिसरावून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
दुसरी घटना काठेगल्लीत घडली. याबाबत रूपाली शैलेश बु-हाडे (रा. सुनंदा हाईटस) यांनी फिर्याद दिली आहे. बु-हाडे या रविवारी रात्री आपल्या सोसायटीच्या आवारात मोबाईलवर बोलत असतांना ही घटना घडली. पार्किंगमध्ये शिरलेल्या अनोळखी दुचाकीस्वारांनी जवळ येवून त्यांच्या गळया्तील सुमारे १ लाख ९८ हजार रूपये किमतीची शॉट पोत व सोनसाखळी बळजबरीने हिसकावून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दिपक तोंडे करीत आहेत.