नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात बेकायदा मद्यविक्रीचे पेव फुटले असून, जागोजागी राजरोसपणे दारू विक्री होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील बेकायदा दारू विक्री रोखण्यासाठी पोलीसांनी रविवारी (दि.१०) विशेष मोहिम राबवून तब्बल २४ मद्यतस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याकारवाईत ९६ हजार ६०० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्यात गावठीसह देशी विदेशी दारूचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतदार व कार्यकर्त्यांना खुष ठेवण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधल्या जात आहे. लक्ष्मी दर्शनाबरोबरच दिवसभर प्रचारात थकलेल्यांना मद्यपानासह जेवणावळीवर मोठा खर्च केला जात आहे. यापार्श्वभूमिवर बेकायदा मद्यविक्रेत्यांना सुगीचे दिवस आले असून रात्री बेरात्री येणाºया ग्राहकांना चढ्या भावाने दारूची विक्री केली जात आहे.
औद्योगीक वसाहतीसह शहरातील चारही विभागातील झोपडपट्यांसह नागरीवस्तीतही राजरोसपणे दारू उपलब्ध होत असल्याने तळीरामांचा उपद्रव वाढला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मद्याला वाढलेली मागणी लक्षात घेवून पोलीसांनीही कारवाईसाठी कंपर कसले असून दिवसरात्र छापेमारी सुरू करण्यात आली आहे. रविवारी केलेल्या कारवाईत २४ मद्यविक्रेते पोलीसांच्या हाती लागले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ९६ हजार ६०० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत शहरातील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.