नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लहान मुलास सोबत घेवून जाणा-या तरूणास टोळक्याने मारहाण करीत लुटल्याची घटना जगतापवाडीत घडली. या घटनेत टोळक्यातील महिलेने सोन्याची अंगठी तर एकाने बळजबरीने रोकड काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिला पुंडलिक गायकवाड,सरला उत्तम दिवे,अनिता मिलींद दिवे,अजिंक्य मिलींद दिवे,प्रतिक मिलींद दिवे,परिचीत उर्फ दादू सोनवणे,सिध्दार्थ उर्फ सोनू सम्राट गायकवाड व उत्तम दिवे (रा.सर्व जगतापवाडी,स्वारबाबानगर) अशी तरूणास लुटणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रविण उर्फ विक्की प्रकाश लोंढे (३१ रा.स्वारबाबानगर) यांनी फिर्याद दिली आहे. लोंढे मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास नऊ वर्षीय पुतण्या प्रतुल यास सोबत घेवून घराकडे रस्तने पायी जात असतांना ही घटना घडली.
जगतापवाडीतील लकी किराणा दुकानासमोरील चौकात संशयितांनी लोंढे यांची वाट अडवित व शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत संशयित उर्मिला गायकवाड या महिलेने चोरीच्या उद्देशाने हातातील ५७ हजार रूपये किमतीची अंगठी काढून घेतली. तर उत्तम दिवे याने जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने खिशातील दोन हजार ३०० रूपये काढून घेत पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.