नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळय़ा भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दोन भरदिवसा झालेल्या घरफोड्यांचा समावेश असून याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घरफोडी मानेनगर भागात झाली.
याबाबत मनिषा गोपाल चंदन (रा. रूद्र रो हाऊस रामगढीया भवन समोर मानेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चंदन कुटुंबिय गुरूवारी (दि.७) सायंकाळी अल्पशा कामासाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली, भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. दुसरी घटना याच परिसरातली गायत्रीनगर भागात घडली. केतन कैलास अडांगळे (रा.साई सेवा,.गायत्रीनगर रासबिहारी लिंकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गेल्या शनिवारी (दि.२) सकाळच्या सुमारास ही चोरी झाली. उघड्या घरात शिरून चोरट्यांनी लक्ष्मीपूजनानिमित्त चौरंगपाटावर मांडलेली सुमारे २ लाख २६ हजार रूपयांच्या दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. अडांगळे यांचा भाऊ सकाळी उठून कामावर गेला असता ही चोरी झाली. दोन्ही घटनांप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडींचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण व जमादार विष्णू हाळदे करीत आहेत. तिसरी घटना सिडकोतील अश्विननगर भागात घडली. दिलीप सखाराम कुटे (रा.हॉटेल ग्रॅण्ड अश्विन मागे) यांनी फिर्याद दिली आहे.
कुटे कुटुंबिय गुरूवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले १५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.