इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवसारीः गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील देवसर गावात शनिवारी सकाळी एका गोदामाला रासायनिक गळतीमुळे लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. एक कामगार बेपत्ता आहे. सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकमधून रसायनांचे पिंप कामगार उतरवत असताना हा अपघात घडला. दरम्यान, केमिकलच्या गळतीमुळे आग लागली आणि सहा कामगार जखमी झाले. जखमींना नवसारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आजूबाजूच्या तालुक्यातून दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली.
पोलिस उपअधीक्षक बीव्ही गोहिल यांनी सांगितले, की ट्रकमध्ये ठेवलेल्या पिंपातून रसायन बाहेर पडल्याने आग लागली. प्रथम ट्रकने पेट घेतला आणि काही वेळातच आग संपूर्ण गोदामात पसरली. परिणामी तीन लोकांचा मृत्यू झाला. तीन कर्मचारी गंभीर भाजले, तर एक अद्याप बेपत्ता आहे. गोदामात कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.