नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हॉटेल मध्ये थांबलेल्या व्यावसायीक महिलेच्या डायमंड ब्रॅसलेटवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. नामांकित गेटवे (ताज) या हॉटेलमधील स्पा सेंटरमध्ये ही चोरी झाली असून सुमारे अडिच लाख रूपयांचे ब्रॅसलेट भामट्यांनी हातोहात लांबविले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रचना ऋषभ सावला (रा.दादर मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रचना सावला या व्यावसायीक शहरात कामानिमित्त आल्या होत्या. महामार्गास लागून असलेल्या हॉटेल गेटवे येथे त्या थांबल्या होत्या. मंगळवारी (दि.५) सकाळच्या सुमारास त्या हॉटेलमधील स्पा सेंटर मध्ये गेल्या असता ही घटना घडली.
स्पा करीत असतांना काढून ठेवलेले त्यांचे सुमारे अडिच लाख रूपये किमतीचे हिरेजडीत ब्रॅसलेट भामट्यांनी चोरून नेले. सर्वत्र शोधा शोध करूनही ते मिळून न आल्याने रचना सावला यानी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.