नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– साडगाव – गिरणारे (ता.जि.नाशिक) येथील वृध्द दांम्पत्याच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामिण पोलीसांना यश आले आहे. भाऊबीजच्या दिवशी जमिनीच्या वादातून सख्या भावाने डोक्यात लाकडी दांडूका हाणून दोघांना यमसदनी धाडल्याचे पुढे आले असून, सुतावरून स्वर्ग गाठत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. बहिणीने मुलबाळ नसल्याने वडिलोपार्जीत जमिनीतील हक्कसोड करून पतीच्या नावे असलेली जमिनही आपल्या नावावर करावी या वादातून ही घटना घडल्याची माहिती अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली.
सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (५० रा.लाडची शिवार ता.जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मृत महिलेच्या भावाचे नाव आहे. साडगाव शिवारात ही घटना घडली होती. माळरानातील शेतवस्तीवर राहणा-या चंद्रभागा रामू पारधी (६५) व रामू राधो पारधी (७०) या दांम्पत्याचा बुधवारी (दि.६) सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता. दोघांचा आकस्मात मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असतांना स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलीसांना कळविल्याने या घटनेचा उलगडा झाला. शवविच्छदनात दोघांच्या छातीत व पोटावर मारहाण करण्यात आल्याचे पुढे आल्याने याप्रकरणी नाशिक तालूका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची दखल घेत अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर,उपविभागीय अधिकारी हरिष खेडकर आदींनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. सर्वत्र शोध घेवूनही मोलमजूरी करून उदनिर्वाह करणा-या दाम्पत्याचे कुणाशीही वैर नसल्याचे तसेच त्यांना मुलबाळ नसल्याचे वास्तव समोर आल्याने पोलीस तपास थंडावला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तळ ठोकत व परिसर पिंजून काढत कुठलाही धागा दोरा नसतांना अवघ्या ४८ तासात या घटनेचा उलगडा केला.
बहिण मेव्हण्याच्या मृत्यूनंतर दु:खाचा डोंगर कोसळल्याचा आव आणणा-या मृत महिलेच्या सख्या भावास बेड्या ठोकल्या आहेत. लाडची शिरात संशयित बेंडकोळी यांची वडिलोपार्जीत जमिन आहे. या जमिनीवर अन्य बहिणींसमवेत चद्रभागाबाईनेही वाटा मिळावा यासाठी मागणी केली होती. त्यातून दोघा भाऊ बहिणीत वेळोवेळी वाद झाले होते. मुलबाळांसह मोठा खटला असल्याने संशयिताने वडिलोपार्जीत जमिनीतील हक्कसोड करून तुला मुलबाळ नसल्याने तुझ्या पतीच्या नावे असलेली साडगाव येथील जमिनही आपल्या नावावर करण्याची मागणी केली होती. त्यातून दोघात नेहमी खटके उडत होते.
भाऊबीजच्या दिवशी रविवारी (दि.३) सायंकाळी संशयित नेहमी प्रमाणे आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. भावाच्या पाहुणचाराचा बेत आखला जात असताना तुम्हाला मुलबाळ नाही. अडिअडचणीत मीच कामात येतो जमिन का सोबत घेवून जाणार आहेत का असे म्हणत त्याने बहिण मेव्हण्याशी वाद घातला. यावेळी बहिणी पाठोपाठ मेव्हण्याही जमिन नावावर करून देण्यास नकार दिल्याने हे दुहेरी हत्याकांड झाले. मेव्हण्याची जमिन नावावर करून घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत संशयिताने वयोवृध्द बहिण मेव्हण्यास लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण केली. रानमाळावर ही घटना घडल्याने पारधी दांम्पत्याच्या मदतीला कोणीही आले नाही. या घटनेनंतर संशयित आपल्या घरी निघून गेला. तर विव्हळत पडलेल्या दांम्पत्याचा पोटात वर्मी मार लागल्याने मृत्यू झाला. घटनेनंतर तिसºया दिवशी दिवाळीनंतर शेतावर परतलेल्या शेजाºयांच्या ही बाब निदर्शनास आली. एकाच्या मृत्यूनंतर विरहाच्या धक्याने दुस-यानेही प्राण सोडल्याचे बोलले गेले. नातेवाईकांकडून अंत्यविधीची तयारी सुरू असतांनाच या घटनेची माहिती पोलीसांना कळविण्यात आल्याने तालूका पोलीसांनी घटनास्थळ गाठून पारधी दांम्पत्याचे शवविच्छेदन केले असता हा खूनाचा प्रकार समोर आला.
स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाळत ठेवून संशयितास ताब्यात घेतले असता या गुह्याचा उलगडा झाला. उलट तपासणीत संशयिताने गुह्याची कबुली देत वरिल घटना कथन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक संदेश पवार,जमादार नवनाथ सानप,शिवाजी ठोंबरे,हवालदार संदिप नागपूरे,मेघराज जाधव,सचिन देसले,विनोद टिळे,हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,रविंद्र गवळी आदींच्या पथकाने केली.