नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिळया पोळया टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १४ वर्षीय मुलीचे एकाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकाच्या घरात घेवून जात संशयिताने हे कृत्य केले असून,त्यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भु-या उर्फ ऋषीकेश अनिल गरूड (२३ रा.मनपा शाळेजवळ,अश्वमेधनगर पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पिडीता बुधवारी (दि.६) रात्री साडे दहाच्या सुमारास शिळया पोळया घराबाहेर टाकण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयिताने तिला गाठून नजीकच्या आपल्या मावशीच्या घरात नेले.
या ठिकाणी विनयभंग करीत संशयिताने तिच्याशी अंगलट केले. बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केल्याने हा प्रकार समोर आला असून,पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.