नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीमघ्ये चोरट्यांनी सुमारे साडे चार लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना अनुसयानगर भागात घडली. याबाबत स्वाती विलास गांगोडे (रा.ओम रो बंगलो,अनुसयानगर) यांनी फिर्याद दिली आहे. गांगोडे कुटुंबिय बुधवारी (दि.६) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यानी बंद घराचे कुलूप तोडून पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये असलेल्या कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. महेश सुनिल खैरणार (रा.सिध्दीविनायक कॉलनी,खांडेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खैरणार कुटूंबिय २ ते ७ नोव्हेंबर दरम्यान देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दोन लाख २३ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ५४ हजार ६२० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.