नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत चोरट्यानी एका वृध्दासह महिलेस चांगलाच झटका दिला आहे. वृध्दाच्या गळयातील सोनसाखळीसह महिलेच्या पर्स मधील दागिण्यांवर भामट्यांनी डल्ला मारला. या घटना नवीन मेळा व ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडल्या असून यात सुमारे पावणे तीन लाखाचे अलंकार भामट्यांनी हातोहात लांबविले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माया रामभाऊ पवार (रा.पेगलवाडी ता. त्र्यंबकेश्वर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार या मंगळवारी (दि.५) कामानिमित्त शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. त्र्यंबकेश्वर बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरटयांनी त्यांच्या पर्र्स मधील सुमारे १ लाख ७१ हजार ६०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार हातोहात लांबविले.
ही घटना बस मार्गस्थ झाल्यानंतर उघडकीस आली तर दुसरी घटना नवीन मेळा बसस्थानकात घडली. याबाबत अशोक आनंदा अलई (६७ रा.चार्वाक चौक,इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. अलई मंगळवारी (दि.५) सकाळी पुणे येथे जाण्यासाठी नवीन मेळा बसस्थानकात आले होते. नाशिक पुणे बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. दोन्ही घटनांबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलीस नाईक शेवरे करीत आहेत.