नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस असल्याची बतावणी करीत तोतयांनी दुचाकीची तपासणी करण्याच्या बहाण्याने एका व्यावसायीकाच्या हॅण्ड बॅगेतील रोकड हिसकावून पोबारा केल्याची घटना विहीतगाव नदी पुलावर घडली. या घटनेत भामट्यांनी सुमारे ६० हजाराच्या रोकडवर डल्ला मारला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिश परसराम ललवाणी (रा.विहीतगाव,ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ललवाणी यांचे मुक्तीधाम भागात महेश कॉस्मेटीक नावाचे दुकान आहे. सोमवारी (दि.४) रात्री सव्वा दहाच्या सुमारास दुकान वाढवून दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. देवळाली गाव परिसरातील विहीतगाव नदी पात्रावरील पुलावरून ते दुचाकीवर प्रवास करीत असतांना शाईन दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले.
पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी दुचाकीची तपासणी करण्याचा बहाणा करून ललवाणी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर संशयितांनी ललवाणी यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली पैसे असलेली मिनी बॅग हिसकावून पोबारा केला. या बॅगेत दुकानाच्या दिवसभरातील व्यवसायाची सुमारे ६० हजाराची रोकड होती. अधिक तपास हवालदार जितेंद्र माळी करीत आहेत.