नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजारी महिलेचा विनयभंग करीत एका दांम्पत्यास मारहाण केल्याची घटना बिटको रूग्णालयात घडली. पतीने जाब विचारल्याने संशयिताने दाम्पत्यास मारहाण केली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील आजारी महिला बिटको रूग्णालयात उपचार घेत आहे. सोमवारी (दि.९) रात्री ती आपल्या वार्डमध्ये एकटी असतांना
ही घटना घडली. कॉटवर महिला झोपलेली असतांना वार्डमध्ये शिरलेल्या इसमाने त्यांच्याजवळ येवून तब्बेतीसह जेवण केले का अशी विचारपूस केली.
रूग्णालयीन कर्मचारी असेल असे समजून महिला त्याच्याशी बोलत असतांना कॉटवर बसलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला. महिलेने आपल्या पतीस बोलावून घेत सदर व्यक्तीस जाब विचारला असता त्याने दाम्पत्यास हाताने मारहाण करीत पोबारा केला. अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. शरणपूर भागात संशयित पोलीसांच्या हाती लागला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॅमसंग मयुर चित्रे (२० रा.संत आद्रिया चर्च बाजूला बेथलेनगर,शरणपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. चित्रे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर पोलीसांनी त्याच्याविरूध्द हद्दपाराची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास एक वर्षाकरीता तडिपार केलेले असतांना त्याचा शहरात वावर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना सोमवारी (दि.९) रात्री तो शरणपूर येथील सुमंगल मेडिकल दुकान परिसरा मिळून आला. याबाबत अंमलदार निलेश वायकंडे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.