नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोड्या वाढल्या असून, वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घरफोडी मखमलाबाद शिवारात झाली. दत्तात्रेय वामनराव चंद्रात्रे (रा.स्वामी विवेकानंद नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चंद्रात्रे कुटूंबिय रविवारी (दि.३) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी चंद्रात्रे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७८ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत. दुसरी घटना गोविंदनगर येथे घडली. याबाबत यशवंत पुंडलीक बागुल (रा.शिवशक्ती अपा.मुरलीधर वझरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बागुल दांम्पत्य गेल्या २७ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास दिवाळी निमित्त फराळ बनविण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून कपाटातील दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ४५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.