नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडकोतील सिंहस्थनगर भागात सतरा वर्षीय मुलावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्यात लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत कोयत्याने वार करण्यात आल्याने मुलगा गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद सातपूते,सिध्दार्थ व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत कल्पना रंगनाथ भडांगे (रा.मारूती मंदिरामागे,सिंहस्थनगर) या महिलेने फिर्याद दिली आहे. या हल्यात महिलेचा मुलगा कार्तिक रंगनाथ भडांगे (१७) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी (दि.२) रात्री सिंहस्थनगर येथील पाटील हॉस्पिटल पाठीमागे हा हल्ला झाला.
कार्तिक भडांगे हा हॉस्पिटल मागून रस्त्याने आपल्या घराकडे जात असतांना टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. किरकोळ कारणातून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कार्तिकवर धारादार कोयत्याने वार करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.
महिलेच्या गळय़ातील लक्ष्मी हार ओरबाडून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वार भामट्यांनी महिलेच्या गळय़ातील लक्ष्मी हार ओरबाडून नेल्याची घटना चार्वाक चौकात घडली. या घटनेत भामट्यांच्या हाती सुमारे ६५ हजार रूपये किमतीचा सोन्याच्या पोतीचा तुकडा लागला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली विलास बोराडे (रा.अरूणोदया सोसा.चार्वाक चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोराडे या शनिवारी (दि.२) बलिप्रदेच्या दिवशी आपल्या बंगल्या समोर उभ्या असतांना ही घटना घडली. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गल्लीत लहान मुले फटाकडे उडवित असतांना त्या गंमत बघत होत्या. दुचाकीवर डबल आलेल्या भामट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळयातील लक्ष्मी हात ओरबाडून नेला. या घटनेत चोरट्यांच्या हाती लक्ष्मी हाराचे सुमारे ६५ हजार रूपये किमतीचे पेंडल लागले असून अधिक तपास पोलीस नाइक परदेशी करीत आहेत.