नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाईपलाईनरोडवरील गुलमोहर कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर जगन्नाथ धामणे (रा.ब्ल्यू हिल अपा. गुलमोहर कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धामणे कुटुंबिय दिवाळी निमित्त शनिवारी (दि.२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक राकेश न्हाळदे करीत आहेत.
मद्याच्या नशेत महिलेस केली बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक वादातून एकाने मद्याच्या नशेत महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना फुलेनगर येथील गौंडवाडी भागात घडली. या घटनेत महिलेच्या कपाळावर वजनी वस्तू मारण्यात आल्याने ती जखमी झाली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत रमेश दोंदे (३५ रा.सम्राटनगर,गौंडवाडी फुलेनगर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सुनिता टोंगारे यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महिला आपल्या घरात असतांना मद्याच्या नशेत घरासमोर आलेल्या संशयिताने तिला कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली. यावेळी महिलेने शिवीगाळ करू नको माझे हात उसनवार घेतलेले पैसे देवून टाक असे म्हटल्याने संतप्त संशयिताने तिला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत महिलेच्या कपाळावर काही तरी वजनी वस्तू मारण्यात आल्याने महिला जखमी झाली असून, अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.