नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भूखंड खरेदी विक्री व्यवहारात बांधकाम व्यावसायीकाची एक कोटी रूपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईस्थित मृत मुळमालकाच्या वारसांने ताबा न देता दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार शशांक थत्ते (रा.मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वारसाचे नाव आहे. याबाबत अशोक काशिनाथ तलवारे (रा.विद्याविकास सर्कल,गंगापूररोड) या बांधकाम व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. मृत चंद्रकांत थत्ते व शशांक थत्ते यांचा मालकिचा गंगापूररोडवरील सर्व्हे नं. ७१५ अ-५ क्षेत्र २००० चौमि पैकी ८०१ चौमी भूखंड आहे. कमलाकांत नावाची इमारत असलेल्या बांधीव भूखंडाचा २००६ मध्ये तलवारे यांनी व्यवहार केला होता. बापलेकाने केलेल्या या व्यवहारात नोटरी करारनामा करण्यात आल्याने तलवारे यानी संबधीताच्या बँक खात्यात एक कोटी रूपयांची रक्कम अदा केली होती.
९ नोव्हेंबर २००६ ते ३० मे २००७ या दरम्यान ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. यानंतर मुळ मालकाचा मृत्यू झाल्याने हा व्यवहार रखडला होता. तलवारे यांनी तब्बल १५ ते १६ वर्ष ताबा व खरेदीसाठी प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही. तलवारे यांनी मुलाकडे तगादा लावला असता त्याने भूखंड विक्रीस नकार देत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.