नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उंटवाडीतील तिडकेनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे बारा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास बाबुलाल परेवाल (६५ रा.मानस व्हिला तिडकेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. परेवाल कुटूंबिय बाहेरगावी गेल्याने ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.२९) रात्री बंद घराच्या खिडकीचे गज तोडून घरात ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे बारा लाखाचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले असून अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.
धारदार शस्त्र घेवून फिरणा-या दोघांवर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धारदार शस्त्र घेवून फिरणा-या दोघांवर बुधवारी (दि.३०) पोलीसांनी कारवाई केली. वेगवेगळय़ा भागात करण्यात आलेल्या या कारवाईत लोखंडी तलवार व कोयता जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली कारवाई त्र्यंबकरोडवर करण्यात आली. शक्ती मिसळ परिसरात वावरणाºया एका तरूणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलीसांनी धाव घेत सागर भगवान हाळनोर (२२ रा.सिध्दीपार्क अपा. श्रमिकनगर) याची अंगझडती घेतली असता संशयिताच्या ताब्यात लोखंडी कोयता मिळून आला. याप्रकरणी अंमलदार भुषण शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.
दुसरी कारवाई नाशिकरोड येथील रोकडोबावाडी भागात करण्यात आली. याप्रकरणी आजम अनवर शेख (रा.रोकडोबावाडी ना,रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी त्याच्या घरझडतीत धारदार तलवार मिळून आली आहे. याबाबत अंलदार सुरज गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत.