नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील गरवारे गेस्ट हाऊसच्या वस्तू संग्रहालयात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुमारे एक लाखाच्या वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला असून त्यात चांदी सह पंचधातूच्या वस्तूंचा समावेश आहे. ही चोरी देखरेख करणाºया तिघांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब रघूनाथ खाडे,दिनकर बहिरू वारूंगसे व कैलास नामदेव बोराडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते म्युझिअम कर्मचारी आहेत. याबाबत योगेश भारत परदेशी (रा.खांडेनगर,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयितांनी दि.२६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वस्तू संग्रालयातील वस्तूंच्या मोजमापात हा प्रकार समोर आला असून, त्यात चांदीच्या व पंचधातूच्या वस्तू गायब झाल्याचे म्हटले आहे. ही चोरी देखभाल करणा-या संशयितांनी केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.