नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्टेट बॅक ऑफ इंडियाची नाशिकरोड शाखा चोरट्यांनी फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खिडकीचे गज कापून बँकेत शिरलेल्या भामट्यांनी कॅशिअर रूममधील कपाटात ठेवलेली तब्बल २५ लाखाच्या रोकडवर डल्ला मारला असून ही घटना सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे नोटांचे बंडल ठेवण्यासाठी काही नसल्याने चोरट्यांनी अंगातील शर्टचा वापर केल्याचा पोलीस तपासात समोर आला आहे. या घटनेने बँकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य प्रबंधक सुरेश बो-हाडे (रा.गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि.२६) पहाटे ही घटना घडली. शुक्रवारी दिवसभराच्या उलाढालीतील दहा लाख रुपयांचा हिशेब लागत नसल्याने बँक अधिकारी सायंकाळ पर्यंत हिशेब जुळविण्यात मग्न होते. काही वेळाने हा हिशेब क्लिअर झाला. त्यानंतर बँक अधिकाºयांनी टॅली करून ५०, १००, २०० रुपयांच्या नोटा स्टाँगरुममध्ये ठेवल्या होत्या. तर ५०० रुपयांच्या १००० रुपयांचे एक बंडल असे सुतळीने बांधलेले ५ बंडल म्हणजे एकूण २५ लाख रुपये हे कॅशियर रूमच्या लोखंडी कपाटात ठेवून सर्व अधिकारी हे घरी निघून गेले. एसबीआयच्या या शाखेतील सुरक्षारक्षक हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच असतात. सरकारी सुटीच्या दिवशी त्यांनाही सुटी असते. शनिवारी, रविवारी सुट्टीच होती. सोमवारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.
शुक्रवारी पहाटे चोरट्याने एका सीसीटीव्ही कॅमे-याची नजर चुकवत तर दुस-या सीसीटीव्ही कॅमे-याचे तोंड वरच्या बाजूला करीत खिडकीचा एक गज कापून आत प्रवेश केला. चोरटयाने ओळख पटू नये म्हणून अंगातून शर्ट काढून सोबत ठेवला होता. तोंडाला, डोक्याला रुमालबांधून केवळ डोळे उघडे ठेवले होते. कॅशियर रूममध्ये गेल्यानंतर चोरट्याने इकडे तिकडे रोकडचा शोध घेतला. मात्र त्याच्या हाती काही लागले नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्याने लोखंडी कपाट उघडले. बँकेच्या कर्मचा-यांनी कपाटाला कुलूप लावलेले नव्हते. यावेळी २५ लाख रुपये घेण्यासाठी त्याच्याकडे बॅग नसल्याने त्याने त्याच्यासोबत असलेल्या टी शर्टमध्ये नोटा बांधून तो आला त्याच मार्गान सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास अलगद निघून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.