नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, पैश्यांचे प्रलोभन टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. पोलीसांनी परिमंडळ २ हद्दीत केलेल्या कारवाईत वाहन तपासणी आणि एका घर झडतीत पोलीसांच्या हाती साडे ३१ लाखाची रोकड लागली असून, सदरची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांच्या आदेशान्वये कडक उपाययोजना केल्या जात आहे. सर्वच पोलीस ठाणे हद्दीत वाहन तपासणी केली जात असून जागोजागी एस.एस.टी पॉईंट नेमण्यात आले आहे. परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला परिसरात वाहनतपासणीत २० लाख ५० हजाराची रोकड हस्तगत केली आहे. एमएच १४ केए ५१८४ या पॅकबॉडी वाहनाच्या तपासणीत ही रक्कम आढळून आली असून,वाहनचालक महेश शरद गिते यांना रोकडबाबत समाधानकारक अथवा रकमेच्या मालकी हक्काबाबत सांगता न आल्याने रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई सातपूरचे वरिष्ट निरीक्षक रणजित नलवडे,विश्वास पाटील,हवालदार आहेर,पोलीस नाईक पाटील शिपाई बहिरम व महिला कर्मचारी परदेशी आआदींसह महसूल विभागाचे अजय निकम व महेश थेटे यांच्या पथकाने केली. दुसरी कारवाई जयभवानीरोड भागात करण्यात आली. बिगारी काम करणाºया ऋषीकेश माधव वानखेडे (रा.भालेराव मळा,मानेकनगर) याच्या घरात मोठी रक्कम व सोन्याचांदीचे दागिणे असल्याची माहिती उपनगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता वानखेडे याच्या घरझडतीत ११ लाखाची रोकड संशयास्पद मिळून आली. सदर रकमेच्या चौकशीत वानखेडे यांना सविस्तर माहिती देता न आल्याने रक्कम जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.