नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील त्रिमुर्ती चौक भागात दारू दुकानाबाहेर बेदम मारहाण करीत दोघांनी लुटल्याची घटना घडली. या घटनेत भामट्यांनी तरूणाच्या खिशातील रोकडसह सोन्याची बाळी व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव कुमावत व लक्ष्मण गारे अशी लुटमार करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुरेश नाथराव खवणे (३६ रा.कामटवाडे,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. खवणे सोमवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास त्रिमर्ती चौकातील विशाल वाईन शॉप या दारू दुकानात गेले होते. आवारातून फोनवर बोलत ते गेटवर आले असता संशयित कुमावत व गारे यांनी त्याची वाट अडवित कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली.
या वेळी संतप्त दोघानी दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत खवणे यांना खाली पाडून संशयितांनी त्यांच्या खिशातील नऊ हजाराची रोकड तसेच मोबाईल व कानातील सोन्याची बाळी असा सुमारे २३ हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.