नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पाथर्डी वडाळारोड भागात घरखाली करण्याच्या वादातून दोघानी तलवारीने जखमी करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सम्राट गायकवाड व निखील निकाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पार्क साईड भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. संशयित व पीडिता एकाच ठिकाणी राहतात. गेल्या सोमवारी (दि.७) हा प्रकार घडली. महिला आपल्या घरात असतांना गायकवाड याने महिलेशी घर खाली करण्याच्या कारणातून वाद घातला. तू माझ्या बापाच्या घरात राहते हे घर सोडून दे अशी कुरापत काढून त्याने महिलेसह तिच्या पतीस शिवीगाळ व दमदाटी केली.
यावेळी संतप्त संशयिताने महिलेस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने तिच्या गळयावर वार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला बचावासाठी खाली वाकल्याने ती थोडक्यात बचावली असून तिला दुखापत झाली आहे. या वादात निकाळे या संशयिताने महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.