नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सातपूर गावातील रिक्षा थांबा भागात बंद गाळयात जुगार खेळणा-या तिघांवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा निवृत्ती गोडसे (रा.विश्वासनगर,अशोकनगर),गजानन शंकर काळे (रा.समतानगर,सातपूर कॉलनी) व संजय रमेश जाधव (रा.अशोकनगर,सातपूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार भुषण शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे. सातपूर गावातील कमानीजवळ असलेल्या रिक्षास्टॅण्ड भागात जुगार खेळला जात असल्याची माहिती सातपूर पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार गुरूवारी (दि.२४) पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित अंडा बुर्जी गाड्याच्या पाठीमागे असलेल्या बंद गाळयात कल्याण मिलन टाईम नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून २ हजार ८५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.