नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फायनान्स कंपनीकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या मोबदल्यात मुंबईच्या त्रिकुटाने शहरातील एकास तब्बल ७० लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कमिशनच्या मोबदल्यात रोख व ऑनलाईन स्वरूपात ही रक्कम उकळण्यात आली असून, दोन वर्ष उलटूनही कर्जरूपी एक रूपयाही पदरात न पडल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप मेनन, वरून मेनन व वैभव मांजरेकर (रा.तिघे वडवली,मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते सप्तश्री क्रेस्ट एल.एल.पी फर्मचे सदस्य आहेत. याबाबत राजेंद्र हुमराज कोळपकर (रा.पाटीलनगर,त्रिमुर्ती चौक सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. कोळपकर यांची व्यावसायीक संबधातून २०२२ मध्ये संशयितांची भेट झाली होती. या काळात व्यवसाय वृध्दीसाठी पाच कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे कोळपकर यांनी बोलून दाखविल्याने त्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याची ग्वाही दिल्याने ही फसवणुक झाली.
यावेळी झालेल्या बैठकीत कर्जाच्या मोबदल्यात टक्केवारी नुसार ७० लाख रूपयांचे कमिशन ठरले होते. कोळपकर यांनी अवघ्या एका महिन्यांच्या कालावधीत संशयितांना आरटीजीएस द्वारे १५ लाख तर ठाणे येथील सप्तश्री एलएलपीचे कार्यालय व शहरातील सीबीएस परिसरात ५५ लाख रूपयांची रोकड संशयितांच्या स्वाधिन केली होती. मात्र दोन वर्ष उलटूनही संशयितांनी कुठलेही कर्ज मिळवून दिले नाही. त्यामुळे कोळपकर यानी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक समाधान चव्हाण करीत आहेत.