नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या तरूणीवर जालन्यात वेळोवेळी बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून परिचीत तरूणाने हे कृत्य केले असून विवाहास नकार दिल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली आहे. जालना पोलीसांनी हा गुन्हा वर्ग केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवल विजय बाविस्कर (रा.रेल्वे स्टेशनरोड,जुने जालना) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित व पीडिता एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात प्रेमसंबध होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने तरूणी जालना येथे गेली असता ही घटना घडली. गेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संशयिताने तरूणीस वेळोवेळी जालना येथे बोलावून घेत आदिती हॉटेलवर नेवून बलात्कार केला.
यानंतर युवतीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार दिल्याने युवतीने जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने हा गुन्हा म्हसरूळ पोलीसांकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.