नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कामगारास दुखापत होवून अपंगत्व आल्याने कारखाना मालकासह व्यवस्थापकाविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्रसामुग्री दुरूस्तीत हलगर्जीपणा केल्याचा दोघांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
बलराम राममुरत दुबे व सतेंद्र बलराम तिवारी (रा.ध्रुवनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कारखाना मालक व व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत धनंजय रामजग तिवारी (३३ मुळ रा. बिहार हल्ली शिवाजीनगर,सातपूर) या परप्रांतीय कामगाराने फिर्याद दाखल केली आहे.
संशयित दुबे यांचा सातपूर औद्योगीक वसाहतीत ऋषभ सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे. या कारखान्यात तिवारी मशिन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. मालकासह व्यवस्थापकास वेळोवेळी नादूरूस्त यंत्रसामुग्रीच्या दुरूस्ती बाबत सांगूनही दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.
गेल्या ६ ऑगष्ट रोजी सायंकाळच्या सुमारास तिवारी पॉवर प्रेस मशिनवर सेवा बजावत असतांना त्यांच्या डावा हात मशिन मध्ये अडकून पंजा कट झाला. या घटनेमुळे त्यांना अपंगत्व आले असून मालक व व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणा मुळे हा प्रसंग ओढावल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भडांगे करीत आहेत.