नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृध्दाच्या बँक खात्यातील पावणे दोन लाख रूपये लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंतीराम बालाजी कातकाडे (६५ रा. सोनगिरी ब्राम्हणपाडे ता.सिन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कातकाडे गेल्या शुक्रवारी (दि.६) शहरात आले होते. सिबीएस परिसरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत त्यांनी पासबुक प्रिंट करून एटीएम बुथमधून बॅलेन्स चेक करण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
बुथमधील मशिनवर ते बॅलेन्स चेक करीत असतांना अनोळखी तरूणाने मदतीचा बहाणा करून त्यांच्या हातातील एटीएम कार्ड लांबविले. कातकाडे घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. अमोल दांडे नावाचे कार्ड हातावर ठेवून पसार झालेल्या भामट्याने त्यांच्या बँक खात्यातील सुमारे १ लाख ७५ हजार रूपये परस्पर वेगवेगळ््या एटीएम बुथमधून काढले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
महिलेच्या पिशवीतील २० हजाराची रोकड पळविली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पासबुक प्रिंट करीत असतांना भामट्यांनी वृध्द महिलेच्या पिशवीतील रोकड हातोहात लांबविल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीएस परिसरातील मुख्यशाखेत घडली. या घटनेत धारदार वस्तूचा वापर करीत भामट्यांनी महिलेच्या पिशवीतील २० हजाराची रोकड पळविली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली धनजी मारू (६३ रा. शिंगाडा तलाव,गुरूद्वारारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मारू या सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास पैसे काढण्यासाठी सिबीएस परिसरातील एसबीआयच्या मुख्यशाखेत गेल्या होत्या. पैसे काढून त्या एटीएम बुथमध्ये पासबुक प्रिंट करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवीस धारदार वस्तूने कापून २० हजाराची रक्कम पळवून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.