नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जाच्या रकमेवर परस्पर डल्ला मारत भामट्यांनी मायलेकास दीड लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हप्ते सुरू होवूनही पदरात रक्कम न पडल्याने मायलेकाने चौकशी केली असता संशयित एजंटानी रक्कम परस्पर हडप केल्याचे वास्तव उघड झाले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव उर्फ विकी सुरेश पाटील व रोशन यादव सोनवणे अशी संशयित भामट्यांची नावे आहेत. याबाबत सिध्दार्थ संजय जाधव (रा.म.फुलेनगर,पेठरोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. जाधव यांना गेल्या सप्टेंबर महिन्यात आर्थिक अडचण असल्याने त्यानी फायनान्स कंपनीकडून कर्ज पुरवठा करून देणा-या वैभव पाटील याच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर संशयिताने उंटवाडी येथील क्रोमा शोरूम भागात जाधव व त्यांच्या आईला बोलावून घेत रोशन सोनवणे याच्याशी ओळख करून देत त्याच्याकडे कर्जासाठी आवश्यक कागदपत्र देण्यास सांगितले. त्यानंतर आईचे कागदपत्र संशयितांकडे सुपूर्द केले असता ही फसवणुक झाली.
संशयितांनी जाधव यांच्या आईच्या नावे बजाज फायनान्स कंपनीचे ७० व आयडीएफसी बँकेचे ७० अशी १ लाख ४० हजार रूपये रकमेचे कर्ज मंजूर करून घेत रकमेवर डल्ला मारला. आईच्या युनियन बँकेच्या खात्यातून बजाज फायनान्सचा ६ हजार १८५ व आयडीएफसी बँकेचा ३०८९ रूपयांचा हप्ता कट झाल्याने हा प्रकार समोर आला असून चौकशीत संशयितांनी मायलेकास विश्वासात घेवून कर्जाची रक्कम अन्य खात्यात वळविल्याचे पुढे आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.