नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी नाशिक पोलीसांच्या वतीने परिमंडळ दोन मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. कारवाईत एक गावठी कट्टा, एक घातक ह्त्यार व दोन तडीपारांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी निवडणुका लक्षात घेता गुन्हेगारी कारवाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत परिमंडळ दोन मध्ये पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री उशीराने कोम्बिंग आॅपरेशन राबवण्यात आले. यामध्ये रेकॉर्डवरील २०६ गुन्हेगार तपासत मिळून आलेल्या गुन्हेगारांची चौकशी करत त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार इंद्रजीत वाघ याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तोल मिळाले. त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच मोरेमळा, पवारवाडी येथे सुनील जाधव याच्या ताब्यात विनापरवाना १५ नग देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. या कारवाईत १०५० चा मुद्देमाल दारूबंदी कायद्यान्वये ताब्यात घेण्यात आला आहे. नाशिकरोड येथे राम पवार रा. सिन्नरफाटा याच्या ताब्यात घातक हत्यार आढळले. त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडीपार गुन्हेगारांची तपासणी केली असता उपनगर व नाशिकरोड परिसरात नितीन बनकर रा. रोकडोबावाडी व उमेश गायधनी रा. पळसे त्यांना निर्बंधित क्षेत्रात आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली. सातपुर पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३३ समन्स व १३ वॉरटची बजावणी करण्यात आली. तसेच मोटार वाहन कायद्यानव्ये ११३ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
………