नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विवाहीतेच्या असह्यतेचा लाभ उठवित परिचिताने महिलेवर बलात्कार केला. तर बाप लेकीच्या पवित्र नात्यास काळीमा फासणारी दुसरी घटना शिंदेगावात घडली. दोन्ही घटनांबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी शिवारात राहणा-या पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा सासरच्या मंडळीशी कौटूबिक वाद सुरू आहे. या असह्येतेचा लाभ उठवित परिचीत असलेल्या सुहास सुदामराव वाकडे (रा.दत्तमंदिर स्टॉप,त्रिमुर्तीचौक उंटवाडी ) या संशयिताने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. २०२१ पासून हा प्रकार सुरू असून सासरच्या मंडळीच्या विरोधात मदतीचा बहाणा करून संशयिताने प्रथम महिलेशी जवळीक साधली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास फोटो व अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सलग चार वर्षापासून हा अत्याचार सुरू असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. संशयिताने महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
दुस-या घटनेत पोटच्या नऊ वर्षीय मुलीवर जन्मदात्या बापानेच बलात्कार केल्याचा प्रकार शिंदेगावात घडला आहे. पीडितेच्या आईने याबाबत पोलीसात धाव घेतली असून संशयित नराधम बापास नाशिकरोड पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिंदेगावातील पाट परिसरात राहणा-या मद्यपी नराधमाने गेल्या आठवड्यात घरात कुणी नसल्याची संधी साधत चिमुकलीस दमदाटी करीत अत्याचार केला. त्यानंतरही त्याने तिन ते चार वेळा पवित्र नात्यास काळीमा फासल्याने मुलीने आपबिती आपल्या मातेकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितास पोलसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.